'वाऱ्याने हलते रान' या ललितलेख संग्रहात कवी ग्रेस यांनी पुराणकथांच्या, दंतकथांच्या, लोककथांच्या, परीकथांच्या, कधी स्त्रीत्वाच्या आलंबन विभावाच्या, तर कधी स्मरणकथांच्या किंवा अगदी प्रहर व ऋतूंच्याही अनुषंगाने निर्मिती आणि निर्मितीप्रक्रिया यांचा वेध घेतला आहे. हा वेध घेताना ग्रेस या निर्मितीप्रक्रियेच्या संदर्भात एक तत्त्व मांडतात, ते असे --- "कला ही जीवनाची पुनर्निर्मिती आहे. थेट निर्मिती सदोष राहणारच, पुनर्निर्मिती सदोष राहणार नाही; तर तिचा कल पर्यायी परिपूर्णतेकडे झुकणारा असेल... पूर्णाकृती पुनर्निर्माणाच्यासाठी कलावंताला जीवनाची समग्र सामग्री कृतज्ञतापूर्वक उचलूनही, जीवनाशीच कायमचे ताटातुटीचे, हेतुपूर्वक क्रूर अनुसंधान जुळवावे लागते." कवी ग्रेस यांच्या या ललितबंधसंग्रहाला साहित्य अकादमीचा (२०११) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.