विंदा करंदीकरांनी बालकविता प्रथम प्रकाशित झाली ती सुमारे पन्नास वर्षांपूर्वी. ती तोपर्यंतच्या बालकवितेपेक्षा पूर्ण वेगळी, वेगळ्या काव्यजाणिवेतून लिहिलेली, नवीन होती. या कवितेने गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मुलांच्या मनावर मोहिनी घातली आहे. बालपणी या कवितांचा आनंद घेणारी मुलं आज मोठी होऊन आपल्या मुला-नातवंडांना तितक्याच आवडीने या कविता वाचून दाखवतात आणि आजची एकविसाव्या शतकातली मुलंही या कवितेच्या बालविश्वात रंगून जातात. हे घडलं कारण या कविता लिहिताना विंदा स्वतः मुलांहून मूल झाले. त्यांचं मन बालकाचं झालं बालकाला त्याच्या प्रतिभेच्या दृष्टीतून जग कसं दिसू शकेल हे त्यांनी ओळखलं आणि तेच जग त्यांनी आपल्या अद्भुतरम्य शैलीतून उभं केलं. म्हणूनच त्यांनी फक्त बालकविता लिहिली नाही तर या कवितांच्या रूपाने मराठीतली श्रेष्ठ कविता लिहिली असं म्हणता येईल. विंदा करंदीकरांची विद्वत्ता, सूक्ष्म अवलोकन, भाषाप्रभुत्व या साऱ्यांचं सामर्थ्य त्यांच्या बालकवितांतही एकवटलं आहे, पण या साऱ्यांनी त्यांच्या कवितेवर कधीच मात केली नाही. त्यांची समृद्ध काव्यजाणीव, त्यांचं भाषावैभव, युआनचे उत्तुंग कल्पनाशक्ती