कवी सौमित्र यांचा 'बाउल' हा नवाकोरा संग्रह. आता रसिकांना उपलब्ध झाला आहे. '...आणि तरीही मी' या पहिल्या संग्रहानंतर तब्बल सतरा वर्षं लागली 'बाउल' तयार व्हायला पण इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेला हा संग्रह वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल याचा विश्वास वाटतो. 'बाउल' हा झेन, सूफी आणि हिंदू संत परंपरांचं मिश्रण असणारा बंगालमधला एक पंथ. 'वाऱ्याने बहकलेले' किंवा 'मॅड अफेक्टेड बाय द विंड' असे हे एकतारीकर. ते सतत रस्त्यांवर असणारे. एका गावात, एका शहरात, एका घरात, एका झाडाखाली एका रात्रीपलीकडे न थांबणारे. फक्त उत्स्फूर्त जगण्यावर विश्वास असणारे. उत्स्फूर्तता हीच जगण्याची धारणा मानणारे. आपण उत्स्फूर्त जगलो नाही तर आपण आपल्यातल्याच खऱ्या नितळ आणि सहज माणसापर्यंत पोहचू शकणार नाही असं मानणारे. सुख, दुःख, आनंद, वेदना, आशा निराशा, ऊन, सावली, पाऊस, वारा असं जे जे वाट्याला येईल त्याचा स्वीकार करणारे. कवी सौमित्र प्रत्येक कलावंतामध्ये हे बाउलपण शोधतात. प्रत्येक कलावंतामध्ये ते थोड्याफार प्रमाणात असतंच. कसलीशी अस्वस्थता मनात घेऊन बेधुंद जगणाऱ्या कलावंताचं मन 'बाउल' संग्रहातल्या सौमित्रच्या कवितांमधून आपल्या हाती गवसेल.